दहिसर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न शेकडो लाभार्थ्यांनी घेतला लाभ


दहिसर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न

शेकडो लाभार्थ्यांनी घेतला लाभ


वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,30/04/26
सर्वसामान्य नागरिकांचे महसूल व शासन सेवांशी संबंधित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ (टप्पा-१) अंतर्गत दहिसर तर्फे मनोर येथे गुरुवारी मंडळस्तरीय शिबीर ग्रामपंचायतीच्या पटांगणात उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार विलास तरे,तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार संभाजी पावरा, दहिसरच्या सरपंच अंकिता भोईर पोलिस पाटील,मंडळ अधिकारी तलाठी तसेच ग्रामपंचायत सफाळे व परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी १५ विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये जातीचे व डोमिसाईल दाखले वितरण, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, ७/१२ उतारा अद्ययावत करणे व डिजिटल ७/१२ वाटप, शिधापत्रिका लाभ, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, आरोग्य सेवा, कृषी योजनांचा लाभ, बँक सेवा, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड वाटप तसेच सनद वितरण अशा एकुण 600 लाभार्थ्यांना विविध सेवा देण्यात आल्या.

तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व वितरण, नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी ई-केवायसी, मतदार नोंदणी व वगळणी या सेवाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

महिला व बालविकास विभाग, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, समाजकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती व लाभांचे वितरण करण्यात आले. या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!