दांडेकर महाविद्यालयात दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपविभागीय केंद्र सुरू उच्च शिक्षणासाठी राज्यातील पहिला अभिनव प्रयोग विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी


दांडेकर महाविद्यालयात दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपविभागीय केंद्र सुरू

उच्च शिक्षणासाठी राज्यातील पहिला अभिनव प्रयोग

विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी

Oplus_16908288
Oplus_16908288

मनोर,26/05/26
आपली स्पर्धा ही एकमेकांशी नसून जगाशी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांशी स्पर्धा करताना विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपविभागीय केंद्र पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुरू करण्यासाठी सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. राज्यात दुहेरी पदवी संकल्पनेला चालना देणारा हा पहिलाच उपक्रम मानला जात असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.

समाजात उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे तसेच नोकरदार व कामगार वर्गालाही शिक्षणाची संधी सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. शिवाजी सरगर आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी करारनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड, संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, उपाध्यक्ष सुधीर दांडेकर, धनेश वर्तक, मंगेश पंडित, अनिल पाटील, सुधीर कुलकर्णी, उपप्राचार्य महेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या नव्या शिक्षण व्यवस्थेमुळे नियमित पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवी मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच शिक्षण पूर्ण केलेल्या नागरिकांनाही विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येणार आहेत. विशेषतः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगार, अधिकारी आणि नोकरदार वर्गासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध आधुनिक व कौशल्याधारित अभ्यासक्रम या माध्यमातून सुरू केले जाणार आहेत. ऑनलाईन व दूरस्थ शिक्षणासाठी प्रवेश व परीक्षा शुल्क नाममात्र असणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. किरण सावे तसेच संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधील विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम पालघरमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाकडे वाढता कल अधोरेखित करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दर्जेदार शैक्षणिक सामग्री निर्मितीची गरज व्यक्त केली. दुहेरी पदवीच्या संधीमुळे विद्यार्थ्यांना अधिक उच्च शिक्षण घेणे शक्य होईल, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसेच औपचारिक शिक्षणासोबत स्वतःचे छंद आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. आज आपण आंतरराष्ट्रीय संस्थांशी स्पर्धा करत आहोत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!