पेट्रोल दरवाढीविरोधात पालघर काँग्रेसचे आंदोलन मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी; नागरिकांना वाटले मेलोडी चॉकलेट


पेट्रोल दरवाढीविरोधात पालघर काँग्रेसचे आंदोलन
मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी; नागरिकांना वाटले मेलोडी चॉकलेट

Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288

पालघर | दि २८:-
पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथील आंबेडकर चौक परिसरातील भारत पेट्रोल पंपावर केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. “दरवाढ कमी करा”, “मोदी सरकार हाय हाय”, “जनतेला दिलासा द्या” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी एक दुचाकी वाहन रस्सी बांधून खेचत पेट्रोल पंपावर आणले आणि केवळ १०० रुपयांचे पेट्रोल भरून वाढत्या इंधन दरांमुळे वाहनधारकांची झालेली अवस्था प्रतीकात्मक स्वरूपात मांडली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानाचेही आंदोलनकर्त्यांनी समर्थन केले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनादरम्यान पेट्रोल पंपावर उपस्थित नागरिकांना “मेलोडी” चॉकलेट वाटण्यात आले. “मोदीजींना मेलोडी इतकी चॉकलेटी का वाटते?” असा उपरोधिक सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!