मनोर येथे वाहतूक नियमांबाबत ट्रक चालकांना जनजागृती अभियान
वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,27/04/26
पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई–अहमदाबाद महामार्गावर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जनजागृती अभियान राबविण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा पालघरचे प्रभारी अधिकारी श्री. अनिल व्हटकर यांच्या वतीने हॉटेल अक्सा परिसरात ट्रक, आयशर, ट्रेलर व कंटेनर चालक–मालक संघटनांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता चालकांमध्ये सुरक्षित वाहनचालनाची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित चालकांना वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
अभियानादरम्यान चालकांना खालील महत्त्वाच्या बाबींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली वाहन चालवताना वैध परवाना (लायसन्स) व वाहनाचे कागदपत्रे जवळ ठेवणे, नेहमी सीटबेल्टचा वापर करणे, ब्लॅक स्पॉट व जंक्शन परिसरात वेग कमी ठेवणे, महामार्गावर अनधिकृत पार्किंग टाळणे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, लेन कटिंग करू नये तसेच वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळावा.
या जनजागृती उपक्रमास ट्रक चालक–मालक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी मनोर वाहतूक पोलीस कर्मचारी योगेश कमलेकर व गोरक्ष पवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून चालकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

