*पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न*
*वेगवान विकासामुळे पालघर जिल्ह्याची प्रगतीशील जिल्ह्याकडे वाटचाल*
*…पालकमंत्री गणेश नाईक*
![]()

पालघर, दि. १ मे : जिल्ह्यात सुरू असलेले विकास प्रकल्प आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याची प्रगतीशील जिल्ह्याकडे वेगवान वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले
महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिवसा निमित्त पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तसेच वरिष्ठ अधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, आणि नागरिक उपस्थित होते.
केंद्राच्या ‘Aspirational District Programme’मध्ये समावेश झाल्यानंतर पालघरमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, वीज आणि डिजिटल सुविधा यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून केंद्र व राज्य योजनांसह CSR निधीच्या प्रभावी वापरातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले .
कृषी क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, ३,३२९ शेतकऱ्यांना सुमारे ६९३ लाख रुपयांचे अनुदान थेट DBT द्वारे वितरित करण्यात आले आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊन ६४२ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. फळबाग आणि बांबू लागवडीसाठी ३,००० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ‘उमेद’ आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळत असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आरोग्य क्षेत्रात सिकल सेल तपासणी, अँनिमिया नियंत्रण उपक्रम आणि प्रत्येक तालुक्यात सुरू झालेल्या डायग्नोस्टिक लॅबमुळे उपचार सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत.
जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जपानच्या ‘जायका’च्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. तसेच डहाणू, जव्हार आणि मोखाडा येथे सुरू असलेल्या मोफत डायलिसिस सेवेमुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २.४९ लाख मजुरांना १९० कोटी रुपयांची मजुरी देण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात मनुष्यदिनांची निर्मिती झाली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी वाढवल्या जात असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
महसूल विभागाने नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेत बिनशेती करातून मुक्तता आणि जमिनीच्या नियमितीकरणासाठी सुलभ प्रक्रिया लागू केली आहे. तसेच, शासकीय सेवांपैकी ९० टक्क्यांहून अधिक सेवा वेळेत दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्रीडा, शिक्षण आणि प्रशासनातील विविध उपक्रमांमुळे पालघर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असल्याचे नमूद करत, “शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत आहे,” असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

