*वसईतील स्थानिक फूल शेतकऱ्यांना मुंबई महापालिका सहकार्य करणार*
*भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या विनंतीनंतर मुंबई महापौर रितू तावडे यांचे आश्वासन*

अनिरुद्ध मिश्रा /विरार : वसई तालुक्यातील फूल उत्पादक स्थानिक शेतकऱ्यांना दादर येथील बाजारपेठेत पहाटेच्या वेळी फुलांच्या विक्रीसाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्यासह शेतकऱ्यांना दिले आहे.
गेल्या ५० वर्षांपासून वसई तालुक्यातील स्थानिक फूल उत्पादक शेतकरी दादर येथील बाजारपेठेत फुले विक्रीसाठी नेत आहेत. वसईतील बागांमध्ये फुलणाऱ्या सोनचाफा, जास्वंद, तगर, मोगरा, सायली आदी फुलांना मुंबईकरांकडून मागणी आहे. वसईतील घाऊक व्यापाऱ्यांपेक्षा दादर येथील फूल बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत असल्यामुळे छोटे शेतकरीही दादर येथे पहाटेच्या सुमारास फूले विक्रीसाठी नेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेने विशेष अभियान सुरू केल्यामुळे फूलविक्रेत्यांना मज्जाव केला जात होता. त्यामुळे ते हवालदिल झाले होते.
गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम फुलांच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या फूलांना मागणी कमी होत आहे. मात्र, वसईतील शेकडो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फूलांच्या शेतीवरच अवलंबून आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दादर येथील फूलविक्रेत्यांच्या व्यवसायाबाबत सहानुभूती दाखविली. त्यानंतर वसई तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भाजपाचे आमदार राजन नाईक यांना निवेदन दिले. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष वेधले होते.
त्यानंतर या प्रश्नावर आमदार राजन नाईक यांनी काही शेतकऱ्यांसह मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची आज भेट घेतली. तसेच त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.
पहाटे साडेचार ते सकाळी साडेसातपर्यंत फूलांची विक्री होणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी व पादचाऱ्यांनाही त्रास होणार नसल्याकडे महापौर तावडे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी वसईतील फूलविक्रेत्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

