*VVCMC महापौर यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची आढावा बैठक संपन्न*


अनिरुद्ध मिश्रा / विरार :-दिनांक १० मार्च रोजी मा.महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा.महापौर दालनामध्ये मनपा बांधकाम विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शहरातील रस्ते, फुटपाथ, गटार बांधकाम तसेच विविध पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, नव्याने रस्ते बांधकाम, पादचारींसाठी सुरक्षित व सुस्थितीत फुटपाथ उभारणी, तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटार व नाल्यांची दुरुस्ती, साफसफाई व देखभाल या कामांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने, निर्धारित वेळेत आणि गुणवत्तेची पूर्ण काळजी घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना मा. महापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मा.महापौर यांनी बैठकीत स्पष्ट केले की, शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मूलभूत सुविधांची उभारणी व देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच विविध विकास कामांच्या नस्ती, देयकांच्या नस्ती वेळोवेळी अद्ययावत ठेवून दिलेल्या मुदतीत कामाच्या निविदा, त्यांच्या मंजुरी, त्याची देयके अदा करणेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
तसेच, नागरिकांकडून तसेच मान्यवर नगरसेवकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्परतेने कार्यवाही करून त्या वेळेत निकाली काढाव्यात, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी गटार व नाल्यांची स्वच्छता पूर्ण करून पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस मा.महापौर अजीव पाटील, मा.उप-महापौर मार्शल लोपीस, मा.स्थायी समिती सभापती प्रविण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, प्र.शहर अभियंता प्रदीप पाचंगे, सर्व सन्माननीय नगरसेविका-नगरसेवक, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, कनिष्ठ अभियंते व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

