*शिरगाव येथे ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ व पालघर मिनी सरस प्रदर्शनाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन*
*“पालघर जिल्हा जगाशी जोडला जाणार*
*…पालकमंत्री गणेश नाईक*
पालघर दि 19 फेब्रुवारी ( जिमाका): शिरगावच्या नयनरम्य किनारपट्टीवर आयोजित ग्लोबल कोकण महोत्सव आणि पालघर मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले हा महोत्सव 22 फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे.
कोकणच्या संस्कृती, पर्यटन आणि स्थानिक उद्योजकतेचा संगम साधणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आमदार राजेंद्र गावित, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर आजिव पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन) एस. पी. रामाराव, डहाणू उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, शिरगावचे सरपंच घनश्याम मोरे, प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, सातपाटीच्या सरपंच सीमा भोईर, पालघरचे भूमिपुत्र व राष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर , आयुष म्हात्रे, ‘राजा रयतेचा महानाट्य’चे दिग्दर्शक हेमंत पाटील, कोकण ग्लोबल प्रतिष्ठानचे संजय यादवराव तसेच प्रसिद्ध सिने कलाकार अरुण नलावडे, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
*किनारपट्टी विकासासाठी व्यापक आराखडा*
पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की शिरगाव, केळवा, सातपाटी, माहीम, चिंचणी, बोर्डी, नांदगाव, वाढराई, एडवन, उसरणी, अर्नाळा आणि वसई या किनारपट्टी भागांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याची भूमिका मांडली. “पर्यटकांसाठी सुरक्षा, स्वच्छता व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत निसर्गसौंदर्य खुलविण्यावर भर दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना डीपीडीसी बैठकीत सविस्तर डीपी प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
*वाढवण बंदरामुळे पालघरचा कायापालट*
वाढवण येथे उभारण्यात येणारे वाढवण बंदर हे आशियातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक ठरणार असल्याचे नमूद करत, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, बडोदा–मुंबई मार्ग आणि विरार–अलिबाग मार्गामुळे जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभे राहील, “उद्योग येतील; मात्र स्थानिक शेतकरी व युवकांचा विकास केंद्रस्थानी राहील,” असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
*हरित पालघरची संकल्पना*
राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचे ध्येय जाहीर करताना, पालघर जिल्ह्यात १२ कोटी झाडे लावण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. वणव्यांवर नियंत्रणासाठी चॉपर व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच एआय व ड्रोनच्या माध्यमातून वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
*स्थानिकांना विकासाचा लाभ*
महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘कोकण सरस’ला चालना देत स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. भविष्यात प्रवासी जलवाहतूक गुजरातपर्यंत नेण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला. “निधी कमी पडला तरी उभारला जाईल; विकास थांबणार नाही,” असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
कोकणच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक विकासाची जोड देणारा हा महोत्सव पालघर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले


*…पालकमंत्री गणेश नाईक*