छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त “स्वच्छता पंधरवडा”चा जिल्ह्यात शुभारंभ
“प्लास्टिक मुक्त, दुर्गंधी मुक्त व स्वच्छ सुंदर पालघर”साठी व्यापक लोकचळवळीचा संकल्प



पालघर दि१९
आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभदिनी पालघर जिल्ह्यात “स्वच्छता पंधरवडा”चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे तसेच प्रकल्प संचालक (जि.प. स्वच्छ मिशन) अतुल पारसकर तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली, स्वच्छतेची सामूहिक शपथ घेण्यात आली तसेच तहसील कार्यालय परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
“प्लास्टिक मुक्त, दुर्गंधी मुक्त व स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा” या अभियानांतर्गत 19 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तालुका प्रशासनाला प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग, एमआयडीसी परिसर, आठवडी बाजार, नदी-नाले, तलाव, समुद्र किनारे आदी ठिकाणी साचलेला प्लास्टिक व इतर कचरा हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कचऱ्याचे ढिगारे (Legacy Waste Sites) व ब्लॅक स्पॉट ठिकाणांची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्लास्टिक निर्मिती, विक्री, वितरण व वापरावर कडक बंदी लागू करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी विशेष प्रश्नावली तयार करण्यात आली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यंत्रणा व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या अभियानाची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी सोशल मीडियावर #cleanpalghar #greenpalghar #plasticfreepalghar हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलूया आणि स्वच्छ, सुंदर पालघर घडवूया,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

