अंबिस्ते पाडा रोडवरील सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघ आक्रमक


अंबिस्ते पाडा रोडवरील सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघ आक्रमक

Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288

वाडा : वाडा-सिद्धेश्वर रोडवरील अंबिस्ते पाडा परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघ यांनी नगर पंचायत प्रशासनाविरोधात आवाज उठविला आहे. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत त्यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज स्पष्टे तसेच संबंधित अभियंत्यांवर गंभीर टीका केली आहे.
योगेश वाघ यांनी सांगितले की, अंबिस्ते पाडा रोड हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज ग्रामीण वाहतूक सुरू असते. मात्र सध्या सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर केला जात असल्याने काही ठिकाणी रस्ता कमी जाडीचा तर काही ठिकाणी फक्त खडी टाकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. यामुळे भविष्यात हा रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
“नगर पंचायतचे अभियंते आणि मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी करण्याची गरज आहे. मात्र ते फक्त एसी कॅबिनमध्ये बसून खुर्ची गरम करण्याचे आणि टक्केवारी घेण्याचे काम करत आहेत. नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांची अशी दुर्दशा होणे दुर्दैवी आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया योगेश वाघ यांनी दिली.
स्थानिक नागरिकांनीही रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी खडी उघडी पडत असून कामामध्ये आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच दर्जेदार काम करून नागरिकांना सुरक्षित आणि टिकाऊ रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!