मीरा भाईंदर पोलीस पदी निवड झालेल्या वैष्णवी सांबरेचा निलेश सांबरे यांच्या हस्ते सत्कार


मीरा भाईंदर पोलीस पदी निवड झालेल्या वैष्णवी सांबरेचा निलेश सांबरे यांच्या हस्ते सत्कार

Oplus_16908288
Oplus_19005440

पालघर, दि. २८ : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर पोलीस दलात निवड झालेल्या वैष्णवी विजय सांबरे हिचा वेवूर गाव ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी मयुरी तांडेल आणि ऐश्वर्या यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना निलेश सांबरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करताना जिजाऊ संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा असून गेल्या महिनाभरात विविध सत्कार समारंभांमध्ये सहभागी होत असताना मला २०१६ मध्ये केलेल्या आंदोलनाची आठवण झाली. त्या आंदोलनाला यश मिळवून देण्यात पालघरमधील पत्रकारांचा मोठा वाटा होता. गेल्या दहा वर्षांत जिजाऊ संस्थेने पालघरपासून रत्नागिरीपर्यंत कार्याचे जाळे उभे केले असून त्याचा मला अभिमान आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, समाजातील गरीब आणि वंचित कुटुंबांतील मुलांना दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने संस्था सातत्याने काम करत आहे. “विद्यार्थी कोणत्या जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा आहे यापेक्षा त्याला योग्य संधी मिळणे महत्त्वाचे आहे. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिजाऊ संस्था करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
वैष्णवी गेल्या एप्रिलपासून संस्थेशी जोडली गेल्याचे सांगत त्यांनी अनेक विद्यार्थी विविध शासकीय पदांवर कार्यरत झाल्याचा उल्लेख केला. “आई-वडील नसलेले किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले तरुणही जिजाऊ संस्थेकडे येतात. त्यांना UPSC, PSI आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वैष्णवीचे वडील भावुक होत म्हणाले, “माझ्या मुलीचा सत्कार निलेश सांबरे यांच्या हस्ते होणे हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी स्वतः पोलीस दलात भरती झालो तेव्हा माझा असा सन्मान झाला नव्हता. जिजाऊ संस्था गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोठे कार्य करत आहे. माझ्या मुलीने मीरा भाईंदर पोलीस दलात निवड मिळवून आमचा सन्मान वाढवला आहे.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दीपक ठाकरे सर तसेच इतर शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. “विद्यार्थी घडविण्यामध्ये शिक्षकांची मोठी मेहनत असते,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक आनंद राऊत, प्रिती मोरे, गावातील नागरिक, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!