दोन वर्षांतच गटारीच्या स्लॅबला भगदाड; वाडा नगरपंचायतीच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह


दोन वर्षांतच गटारीच्या स्लॅबला भगदाड; वाडा नगरपंचायतीच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

वाडा | प्रतिनिधी
वाडा नगर पंचायत हद्दीतील वाणी आळी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या गटारीच्या स्लॅबला अवघ्या दोन वर्षांतच मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित गटाराचे बांधकाम काही वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आता या स्लॅबची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाणी आळी हा वाडा शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर मानला जातो. या भागातून दररोज नागरिक, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी गटारीच्या स्लॅबला भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांनी नगरपंचायतीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत, संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “करदात्यांच्या पैशातून होणारी विकासकामे टिकाऊ आणि दर्जेदार असणे अपेक्षित असताना अवघ्या दोन वर्षांत स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत येणे हे गंभीर आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
याप्रकरणी वाडा नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज स्पष्टे यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित कामाची चौकशी करावी तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच धोकादायक झालेला स्लॅब त्वरित दुरुस्त करून परिसर सुरक्षित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या घटनेमुळे वाडा नगरपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!