*छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन*
*राष्ट्रभावना आणि स्वच्छतेचा संदेश देणारा उपक्रम*
*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*
पालघर, दि. १८ : राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवांचे मोलाचे योगदान अधोरेखित करत केंद्र शासनाच्या युवा कल्याण व खेळ मंत्रालय, भारत सरकार तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी “जय छत्रपती शिवाजी जय भारत” या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पदयात्रा सकाळी ७ वाजता पालघर येथील पाचबत्ती चौकातून प्रारंभ होऊन तहसील कार्यालयापर्यंत मार्गक्रमण करणार असून सकाळी ७.३० वाजता समारोप होईल. पदयात्रेनंतर तत्काळ स्वच्छता मोहिमेच्या पंधरवड्याला सुरुवात करण्यात येणार आहे.
राष्ट्रभावना जागृत करणे, सामाजिक सलोखा दृढ करणे, युवांमध्ये नेतृत्वगुण व व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे, तसेच कला, संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हेतूही यामागे आहे.या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुख, अधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, खेळाडू, स्काउट-गाईड तसेच NCCचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या गणवेशात तसेच पारंपरिक व सांस्कृतिक वेशभूषेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
ढोल-ताशा पथक, लेझीम, योगा, मल्लखांब आणि ऐतिहासिक व पारंपरिक कलापथकांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमणारका आहे. “जय छत्रपती शिवाजी जय भारत” या घोषणांनी पालघर नगरीत राष्ट्रप्रेमाची आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला .

