*सेवा हक्क दिन उत्साहात साजरा*
*महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नागरिकांना सक्षम करणारा कायदा*
*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*

पालघर दि २८ एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ हा नागरिकांना सक्षम करणारा क्रांतिकारी कायदा असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनविण्याचा हा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा . प्र) रणजित देसाई उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक दीपक उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश गोरे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर पाटील, तहसीलदार नरेंद्र माने, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत पारदर्शक, जबाबदार आणि कालबद्ध सेवा वितरणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, “ या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय सेवा ठराविक कालमर्यादेत मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यासाठी डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अधिनियमानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्या सेवा, जबाबदार अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा अधिसूचित करणे बंधनकारक आहे. नागरिकांना सेवा नाकारल्यास किंवा विलंब झाल्यास अपील करण्याचा अधिकार देण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूदही आहे. त्यामुळे प्रशासनातील कार्यक्षमता आणि जबाबदारी वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेत, “नागरिकांना सेवा देताना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि तत्परता राखण्याचे” वचन दिले. सेवा वितरण प्रक्रियेत कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देण्यात आली.
नागरिकांना शासनाच्या सेवा सुलभतेने मिळाव्यात यासाठी “आपले सरकार” पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.
या पोर्टलद्वारे विविध शासकीय सेवांसाठी ऑनलाइन अर्ज, स्थिती तपासणी व तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहेत.
*लघुसंदेश (SMS) मोहीम सुरू*
“महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या अधिसूचित सेवा मिळवा कालमर्यादेत. ‘आपले सरकार पोर्टल’ आपल्या सेवेत – https://aaplesarkar.mahaonline.gov.in”
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने नागरिक-केंद्रित सेवांसाठी नव्याने वचनबद्धता व्यक्त केली असून, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

